- नगरसेवक शैलेश मोरे आणि देवी एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार
- महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रवेशद्वारावर देखील करणार सॅनिटायझर-टनेलची उभारणी – नगरसेवक शैलेश मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसून येत आहे. मास्क, सॅनिटायझरचे वाटप होताना दिसून येत आहे. याचा सर्वाधिक धोका अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, रुग्णालयीन कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना अधिक आहे. त्यांना शासनाच्या माध्यमातून सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जातात. मात्र, त्याशिवाय अजून एक खातं असं आहे जे चोवीस तास शहराच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देत शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. ते म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस. त्यांनाही सुरक्षा साधनांची गरज भासत आहे. त्यासाठी भाजपा नगरसेवक शैलेश मोरे आणि देवी एज्युकेशन सोसायटीचे तोतारामशेठ सुखवाणी यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्व-खर्चाने पिंपरी पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर-टनेलची उभारणी केली आहे.

यावेळी पिंपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवक शैलेश मोरे यांनी कोरोनाच्या लढाईत पोलिसांना दोन वेळचा जेवणाचा घास मिळावा म्हणून अन्नाचे पाकिटे देखील पुरविली आहेत. त्यानंतर त्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पोलिस स्टेशन येथे सॅनिटायझर-टनेलची उभारणी करून दिली. त्यामुळे पोलिसांनी नगरसेवक शैलेश मोरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
माहिती देताना नगरसेवक मोरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्ह्यातील दोन नंबरचे कोरोना केंद्र बनले आहे. संचारबंदी असल्याने पोलीस शहरात जागोजागी बंदोबस्तासाठी आणि नागरिकांनाच्या सेवेसाठी तत्पर असून, आपली कर्तव्य प्रामाणिकपणे बजावीत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा संसर्ग कधीही होऊ शकतो, ही भीती पोलिसांच्या मनात सतत असली तरी, कर्तव्यदक्ष पोलिस जीवाची बाजी लावून, जनतेसाठी खंबीरपणे उभे आहेत. शहरातील काही पोलीस बांधवाना कोरोनाची लागण देखील झालेली आहे. त्यामुळे पोलिसांची स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेत, निर्जंतुकीकरणासाठी पिंपरी पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर-टनेलची उभारणी केली आहे. त्यामुळे पोलिसांचे निर्जंतुकीकरण होईल व काही प्रमाणात कोरोनाचा धोका टळेल. काही दिवसात पिंपरी चिंचवड शहरातील अति महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रवेशद्वारावर देखील जंतुनाशक फवारणी यंत्र बसवण्याचा मानस आहे, नगरसेवक मोरे म्हणाले.













