- माजी महापौर राहुल जाधव यांनी आ. महेश लांडगे यांच्याशी चर्चा करून, दिले आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरात कायम आगीच्या घटना घडत असतात. अगदी काल-परवाच आगीची मोठी घटना या परिसरात घडली. ती आग अजूनही धुसमुसत आहे. या समस्येबाबत माजी महापौर तथा प्रभागाचे स्थानिक नगरसेवक राहुल जाधव यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याशी सविस्तर चर्चा करून, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिखली, कुदळवाडी, जाधववाडीमध्ये कायम आग लागण्याचे सत्र सुरु आहे. यामुळे या भागातील नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या आगीत केवळ लाकडं किंवा कागदी वस्तू जळत नाहीत तर, त्यात काही केमिकलयुक्त रसायनमिश्रीत वस्तू देखील जळतात. त्यामुळे प्रदूषण होत आहे. ते प्रदूषण मानवी शरीरासाठी खूप अपायकारक आहे. त्याचा या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर, येथील गुंतवणुकीवर प्रभाव पडत आहे. त्यामुळे या भागाचा विकास, वाढती लोकसंख्या व रहिवासी या सर्व घटकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या घटनांमुळे वारंवार आमच्या लोकांना या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. त्यातून आमच्या लोकांची कायम सुटका होण्यासाठी येथील अनधिकृत शेड, भंगाराची अनधिकृत दुकाने आणि ज्या गोष्टीपासून आमच्या लोकांना त्रास होतो, त्या सर्वांवर आपण लवकरात लवकर कारवाई करावी, असे या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती, जाधववाडी या भागांमधील अनधिकृत शेड, अनधिकृत भंगाराची दुकाने, या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच परिसर पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. – श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त.


















