न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :-. औद्योगिकनगरीत बहुतांश कामगार वर्ग वास्तव्य करीत आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कारखाने बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने दररोज सकाळी आणि सायंकाळी सुमारे ३० हजार लोकांना सकस जेवण देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना महापालिका भवनात आयोजित बैठकीत प्रशासनाला करण्यात आल्या. त्यासाठी तातडीने लागणाऱ्या सर्व खर्चासाठी यापूर्वीच स्थायी समिती सभेने मान्यता दिलेली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक एकनाथ पवार, विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदी उपस्थित होते.
करोना रुग्ण आढळलेला परिसर त्वरीत सील करून त्या भागातील तपासणी तातडीने करावी. दवाखान्यामध्ये काम करणारांना वेतन दुप्पट द्यावे. मी तसेच डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, वार्ड बॉय यांची तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरती करावी. प्रसंगी त्यांच्यासुध्दा मानधनात वाढ करावी, आदी सूचनाही पदाधिकाऱ्यांनी केल्या.


















