न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारी आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. एका पुरुषाचा त्यात समावेश आहे. या पुरुषाचे वय ३९ वर्षे आहे. अहवाल सकारात्मक आलेला हा रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील नसून पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील आहे. दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ६९ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४९ वर गेली आहे. एकूण २१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३७ रुग्ण दाखल आहेत.
भोसरी येथील रहिवासी असलेला एक कोरोनाबाधीत रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल होता. त्याची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्याला आज घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
तसेच आज रुपीनगर निगडी येथील हनुमान मंदिर – समर्थ सुपर मार्केट – भाग्यलक्ष्मी बस पार्किग – ओम साई दुध डेअरी – भूषण गंगा एजन्सी – लकी एंटरप्रायजेस – ज्ञानदिप प्रायमरी स्कूल – माऊली मेडिकल – आय. सी. आय. सी. आय बैंक ए. टी. एम. हनुमान मंदिराचा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यत सील करण्यात येत आहे.
सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.















