- कामगार नेते इरफान यांचे मुस्लीम बांधवाना आवाहन..
- महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने यमुनानगरमध्ये माथाडी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनमुळे शहर पूर्ण ठप्प झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच माथाडी कामगारांचे रोजगार बुडाले आहेत. माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कठीण संकटकाळात, बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राचे कामगार नेते तथा भोसरी-खेड विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मजदूर संघटना कामगारांच्या मदतीला धावून आली आहे. ही संघटना नेहमीच असंघटीत बांधवांच्या हिताचा विचार करीत, त्यांच्यासाठी झटत असते. कोरोना युद्धातही संघटनेच्या माध्यमातून शहरातील गोर-गरिबांन मदत व्हावी यासाठी शहरात विविध उपक्रम सुरु आहेत. गोरगरीब मुस्लीम बांधवांचेदेखील लॉकडाऊन मुळे हाल होत आहेत. त्यातच मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान महिन्याचे उपवास आजपासून सुरु झाले आहेत. त्यांच्यासाठी देखील इरफानभाईंची संघटना मदतीसाठी सरसावली आहे. तसेच पवित्र ‘रमजान’ हा सब्र चा महिना आहे. मुस्लिम बांधवांनी या महिन्यात दानधर्माच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना बळ द्यावे.
दरम्यान महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने यमुनानगर, निगडी येथे माथाडी कामगार बांधवांना पीठ, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाले व आदी जीवनावश्यक साहित्याचे प्रती पाच, दोन, एक किलोप्रमाणे एक-एक किट तयार करून त्या कीटचे नुकतेच कामगारांना वाटप करण्यात आले. या आधी देखील कोरोनामुळे कामगार बांधवांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून निगडी, चिंचवड व मोहननगर परिसरातील कामगार बांधवांसाठी संघटनेने जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले आहे.
आज शनिवारपासून मुस्लीम बांधवांच्या रमजान या पवित्र उत्साहाला सुरवात होत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मुस्लीम बांधवदेखील घरीच आहेत. त्यांच्यासाठी देखील इरफानभाई सय्यद यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व साहित्याच्या वाटपास सुरुवात होणार आहे.
इरफान सय्यद यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शहरातील कामगार, कष्टकरी बांधवांवर यामुळे आभाळ कोसळले आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून माथाडी, बांधकाम आणि असंघटीत कामगार बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहे. देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज शनिवारपासून ‘रमजान’ हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होत आहे. चाँद दिसल्यामुळे मुस्लीम बांधवांच्या उपवासांना आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, गोरगरीब कामगार व हातावरील पोट असणारे मुस्लीम बांधव घरातच अडकून पडले आहेत. त्यातच रमजानचे उपवास अनं जवळचे पैसे संपल्यामुळे गोरगरीब मुस्लीम बांधव हवालदिल झाले होते. याची कुणकुण लागताच कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लीम बांधवाना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार केले. या कीटमध्ये खजूर, तांदुळ, पीठ, मसाले/मीठ, बेसन पीठ, तेल, मसूर, हरभरा, साखर, चहापत्ती यांचा समावेश आहे. या किटचे आजपासून मुस्लीम बांधवाना वाटप केले जाणार आहे, अशी माहिती इरफानभाई यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन लागू केले आहे. त्यामुळे बाजारपेठा, धार्मिक स्थळे बंद आहेत. अशा स्थितीत आजपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र महीना रमजान सुरू झाला आहे. या कालावधीत रमजानचे उपवास, इफ्तार व नमाज पठण मुस्लिम बांधवांनी घरी राहूनच करावे. तसा संकल्प संपूर्ण मुस्लीम समाजाने केला पाहिजे. रमजानमध्ये दान धर्माला मोठे महत्त्व आहे. रमजान ईदच्या दिवशी अनेक जण दान करतात. त्याला जकात असे म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या किमान अडीच टक्के जकात द्यायला हवी. कोणताही धर्म, जात न बघता प्रत्येक गरजूला जकात दिल्यास त्यांना मदत होते. सध्या कोरोना विषाणूमुळे गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत. सामाजिक सलोखा जपण्यासाठी मुस्लीम समाजाने गरजूंना मदत करायला हवी. कोरोना युद्धात स्वतःचा बचाव करता यावा. यासाठी शहरातील मुस्लीम बांधवानी घराबाहेर पडू नये, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करीत, ‘पवित्र रमजान महिन्यात आपल्या समाजात सौहार्द, आनंद आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी हीच सदिच्छा,’ अशा शब्दांत शहरातील मुस्लीम बांधवाना इरफानभाई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


















