न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- इंदिरानगर येथील रेशनिंगच्या दुकानाचे धान्य घेऊन वाहन आले होते. ते धान्य रेशन दुकानात उतरवून घेताना काही जणांनी अडथळा केला. त्यामुळे घटनास्थळी पोलीस दाखल झाले. धान्य उतरवून देण्याबाबत काही हरकत असल्यास पोलीस चौकीत तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी पिंपरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मोहननगर पोलीस चौकीत पोहचले. तेथे त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करून धमकी दिली. आरडाओरडा करून आरोपी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी केली.
तुम्ही आमच्या मुलांना मारून टाकताय का, आम्ही तुमची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू, तम्हाला आम्ही कोण आहोत. ते दाखवून देऊ, अशी धमकी आरोपी यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदीचा आदेश असताना विनाकारण घराबाहेर पडून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना मोहननगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी धर्मराज किसन तोडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार बाबू मंजाळकर (वय २५), तेजस दिगंबर शिंदे (वय २४), जया बाबू मंजाळकर ( वय ४६ ) आणि वंदना दिगंबर शिंदे ( वय ४५ , सर्व रा . इंदिरानगर , चिंचवड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.


















