- कोरोनाच्या लढाईत दानशुरांनीदेखील पुढे यावे, चाबुकस्वार यांचे आवाहन..
- मुस्लीम बांधवानी रमजानचे उपवास, इफ्तार व नमाज पठण घरी राहूनच करावे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाॅकडाऊन मुळे शहरातील सर्व क्षेत्रातील कामे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या असंघटीत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील विशेष घटक म्हणून गोरगरिबांकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी स्वयंसेवी ब्रीद जोपासत शहरातील रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात हातावरील पोट असणाऱ्या तसेच परप्रांतीय कामगारांना ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे.
हा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरु असून, परिसरातील जवळपास शेकडो नागरिकांना त्यांच्या वतीने अन्नाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची भूख भागत असून, कोरोना युद्धात तग धरण्याची नवी उमेद तयार होत आहे.
याबाबत माहिती देताना अरुण चाबुकस्वार म्हणाले की, संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या भीतीने त्रस्त आहे. प्रत्येक देश या विषाणूशी लढत आहे. कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, देशात लॉकडाऊन लागू केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला व परराज्यातून आलेल्या लोकांना ‘आहे तिथेच रहा’ आहे असे सांगितले आहे. मात्र, कामच नसल्यामुळे व जवळचे पैसे संपल्यामुळे गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर येथील गरजू लोकांसाठी ‘एक हात मदतीचा‘ हा उपक्रम सुरु केला. भुकेलेल्यांना जमेल तसे जेवू घालत आहे. मात्र, ही लढाई कोण्या एकट्याच्या जीवावर आपण जिंकू शकत नाही. या लढाईसाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढे आले पाहिजे. माझ्या वतीने जमेल तसे अन्नदानाचे कार्य सुरु आहे. तसेच ज्या कोणाला समाजातील गरजू लोकांना दोन वेळचे जेवण पुरवायचे असेल त्यांनी ९८५०१०४०४० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून त्यांची मदत भुकेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचविली जाईल.
तसेच पुढे बोलताना चाबुकस्वार म्हणाले की, आजपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र महीना रमजान सुरू झाला आहे. महिनाभर उपवास असल्याने मुस्लीम बांधवानी मशिदीत न जाता, या कालावधीत रमजानचे उपवास, इफ्तार व नमाज पठण घरी राहूनच करावे. सध्या कोरोना विषाणूमुळे गोरगरीब नागरिकांचे हाल होत आहेत. सामाजिक सलोखा जपण्यासाठी मुस्लीम समाजाने देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. पोलिसांना सहकार्य करावे. महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार घरी राहून, स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, ‘पवित्र रमजान महिन्यात आपल्या समाजात सौहार्द, आनंद आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी, याच माझ्या वतीने मुस्लीम बांधवाना सदिच्छा.’


















