- सुखदायक… शहरातील तीन जण कोरोनामुक्त.. तर, जिल्हा रूग्णालयातील एका महिलेचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज नव्याने आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. एक पुरुष आणि एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. पुरुषाचे वय ५२ वर्षे असून, महिलेचे वय ६५ वर्षे आहे. अहवाल सकारात्मक आलेले हे दोन्ही रुग्ण दिघी आणि मोशी परिसरातील आहेत.
तसेच, सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी (दि. २४) रोजी रात्री करोनाने ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिला पुण्यात राहण्यास होती. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्याचा जुना आजार होता.
आज दिघी आणि भोसरी येथील रहिवाशी असणारे तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या १४ दिवसानंतरच्या आणि त्यानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे आज शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २४ वर पोहोचली आहे. याशिवाय आणखी तिघांचे १४ दिवसांच्या उपचारानंतरचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ८४ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ६० वर गेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ४८ रुग्ण दाखल आहेत.


















