- चिंचवडगाव आणि परिसरात एकही कोरोना रुग्ण नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. आतापर्यंत शहरात केवळ ४ जणांचा बळी गेला आहे. त्यातील दोघे ज्येष्ठ नागरिक होते. त्यांना पूर्वीपासून इतर आजार होते. तर, पुण्यातून शहरात आलेली महिला अगदी शेवटच्या टप्प्यात वायसीएम रुग्णालयात दाखल झाली.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर थेरगाव येथील सुरक्षारक्षक वायसीएममध्ये दाखल झाला होता. मृत्यूचे हे प्रमाण एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या ५ टक्केपेक्षा कमी आहे, असे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले.
सर्वाधिक २३ रुग्ण ‘ ई ‘ क्षेत्रीय हद्दीत :-
पालिकेची ८ क्षेत्रीय कार्यालये असून, प्रत्येक कार्यालय क्षेत्रात प्रत्येकी ४ प्रभाग आहेत. त्यात कोरोनाचे सर्वाधिक २३ रुग्ण ई ( भोसरी ) क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आढळून आले आहेत. ‘ फ ‘ ( टिळक चौक , निगडी ) क्षेत्रीय कार्यालय हद्दीत १२ रुग्ण आहेत. ‘ क ‘ ( नेहरूनगर ) क्षेत्रीय कार्यालयात ८. ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयात ५ , ‘ ड ‘ ( रहाटणी ) क्षेत्रीय कार्यालयात ३ , तर , ‘ अ ‘ ( भेळ चौक , निगडी ) क्षेत्रीय कार्यालयात २ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ‘ ब ‘ ( चिंचवडगाव ) व ‘ ग ‘ ( थेरगाव ) क्षेत्रीय कार्यालय परिसरात एकही रुग्ण आढळलेला नाही .


















