न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२०) :- सध्या पिंपरी चिंचवड शहरात करोनानं थैमान घातलं आहे. करोनापासून बचावासाठी महापालिका अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, सध्या काळेवाडी आणि रुपीनगर परिसरात करोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या तीन रुग्णांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यानंतर त्यांच्या २४ तासानंतरच्या दोन्ही कोरोना चाचण्या केल्या. तरीही त्या चाचण्या निगेटिव्ह न येता पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आज बुधवारी पिंपरी चिंचवड शहरातील चार जणांना आणि शहराबाहेरील चार जण असे मिळून आठ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. या सर्वांना कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे. यात रुपीनगर, थेरगावातील १६ नंबर बस स्टोप, देहूरोड, तसेच पुण्यातील रविवार पेठ आणि पुणे स्टेशनकडील रुग्ण आहेत.
मंगळवारी पिंपरी चिंचवड महापालिकेने १७९ जणांचे घशातील द्राव तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यांचे कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ११० वर पोहचली आहे. तर, ३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आजपर्यंत चौघांचा आणि आज एका खडकीतील महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे.













