- अशीच आपुलकी सर्वांनी दाखविली तर, आपण कोरोना युध्द नक्कीच जिंकू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- कोरोना झाल्यावर अनेक ठिकाणी त्या कोरोनाग्रस्तांना पिडा देण्याचे, त्यांना वाळीत टाकण्यासारख्या घटना घडत असताना, चिंचवड येथील संभाजीनगरमधील रहिवाशांनी आपल्या कृतीतून वेगळे उदाहरण पुढे केले आहे.
पुण्यातील नामवंत रुग्णालयात नोकरी करत असणाऱ्या एका नर्सला व तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेही पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान या दोघांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने आज त्यांना डीश्चार्ज मिळाला होता. त्यामुळे हे दांपत्य आपल्या संभाजीनगरमधील घरी आले. येथील रहिवाशांचे वेगळेच रूप त्यांना पहावयास मिळाले. येथील रहिवाश्यांनी चक्क या दाम्पत्यांचे फुले उधळून, ढोल-ताशाच्या गजरात व औक्षण करून स्वागत केले. सोसायटीतील रहिवाश्यांच्या आदरातिथ्याने हे दाम्पत्य सुखावून गेल्याचे पहावयास मिळाले.
संभाजीनगर येथील रहिवाश्यांच्या कृतीतून त्यांनी इतरांपुढे अनोखा आदर्श उभा केला आहे. त्यामुळे इतरांनी देखील याचा आदर्श घ्यावा व कोरोनाग्रस्त किंवा संशयित लोकांकडे आपुलकीने पहावे.


















