न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- आषाढीवारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. महिन्यावर येऊन ठेपलेला सोहळ्याबाबत अद्यापि शासकीय नियोजन बैठक होऊ शकली नाही किंबहुना याबाबत निर्देशही प्राप्त झाले नाहीत.
त्यामुळे शासनाच्या निर्णयानंतर सोहळ्याचे नियोजन होईल, अशी माहिती संस्थानच्या विश्वस्तांकडून देण्यात आली. सुमारे ३३५ वर्षांची परंपरा असलेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी कोरोनामुळे प्रभावित होण्याची चिन्हे आहेत. या वर्षी १२ जूनला पालखी प्रस्थान आहे. मात्र, राज्याची परिस्थिती पाहता या वर्षी हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यातच सर्व शासकीय अधिकारी कोरोनाच्या लढाईत गुंतले असल्याने पालखी सोहळ्याची नियोजन बैठक अद्यापि होऊ शकली नाही.
या बैठकीची संत तुकाराम महाराज संस्थानला प्रतीक्षा आहे. शासनाकडून सूचना मिळतील तसा पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. संजय महाराज मोरे यांनी दिली. महाराजांचे वंशज तपोनिधी नारायण महाराज यांनी १६८५ साली पालखीतून पादुका पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली. तीच पुढे कायम असून या वर्षी सोहळ्याचे ३३५ वे वर्ष आहे.


















