न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- कोरोना आपत्तीचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असणा-या, कष्ट करून कुटुंब पोसणा-या मजूरांना व स्थलांतरित मजूरांना बसला आहे. त्यांच्या विविध मागण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने आज १ मे रोजी आगळा-वेगळा राज्यव्यापी उपवास करण्यात आला.
असंघटीत कामगाराना आर्थिक सहाय्य देण्यात यावे व उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना कार्ड नसले तरी मोफत धान्य मिळाले पाहिजे. राज्यांतर्गत स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. लाॅकडाऊन मधे ज्या मजूरांना त्यांचे थकीत वेतन व देय वेतन मिळण्यासाटी तालुका व जिल्हा स्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा बजावणा-या सर्व कर्मचा-यांना दुप्पट पगार द्यावे व पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे. या काळात घसरलेल्या आर्थिक वाढीच्या दराचा बोजा कामगार वर्गाच्या माथी मारून कामगार विरोधी धोरणे व कायदे करण्यात येऊ नयेत. लाॅकडाऊन संपवण्याची रणनीती विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींसोबत चर्चा करून ठरवण्यात यावी. ही कृती सरकार विरोधी नाही, सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारीचे भान करून देण्यासाठी जागृत नागरिकांनी उचललेले सजग पाऊल आहे. तसेच संपूर्ण देश व देशातील संपन्नता ज्यांच्या अमूल्य योगदानावर व श्रमावर उभी असते त्या कामगार वर्गाप्रति आपले उत्तरदायित्व व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. या मागण्या समाजासमोर व सरकारसमोर लावून धरण्यासाठी, श्रमिकांच्या आत्मसन्मानासाठी सुर्योदय ते सुर्यास्त दरम्यान हा उपवास करण्यात आला.
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष गणेश राठोड ,राजेश माने, इरफान चौधरी ,अनील बारवकर , महिला आघाडीच्या माधुरी जलमूलवार, वंदना थोरात, अर्चना कांबळे, सुनिता वाठोरे, नाना कसबे, उमेश डोरले आदीनी विविध ठिकाणी सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
राज्यात सर्व जिल्ह्यात उपवास करण्यात आले.यात जेष्ठ नेते उल्का महाजन, चंदन कुमार, नितिन पवार, मेकँजी दाबरे, सुभाष लोमटे, हिरामण पगार यांचा सहभाग होता, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिली.


















