न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले.
कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यू दर कमी करणे गरजेचे आहे. महानगरपालिकांतर्गत असणाऱ्या हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवावी. कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यासाठी सहभाग घ्यावा. अति संवेदनशील भागात टेस्टींगचे प्रमाण वाढवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याबाबत विचार करा. झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून या भागातील स्वच्छतेवर भर द्यावा. तसेच येथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप लवकरात लवकर करा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशी जास्त रुग्ण संख्या असणारी शहरे वगळून अन्य ठिकाणी इंडस्ट्री सुरु करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे, असेही ते म्हणाले.


















