न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंतरराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असं आदेशात सांगण्यात आलं आहे.
त्यासाठी प्रत्येक राज्यात मध्यवर्ती गट तयार केला जाणार असून हे गट ठिकठिकाणच्या निवाऱ्यांमधील स्थलांतरित मजुरांची नोंद करतील. त्याची माहिती त्यांच्या मूळ राज्यातील प्रशासनाला दिली जाईल. संबंधित दोन्ही राज्यांची अशा आंतरराज्यीय प्रवासावर सहमती असावी लागेल. दोन्ही राज्यांनी ठरवून मजुरांसाठी बसगाडय़ांची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. बसगाडय़ा निर्जंतूक करून संसर्ग टाळला जाईल, यारितीने मजुरांच्या प्रवासाला अनुमती दिली जाईल.


















