- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दहा वाजता जनतेशी साधणार संवाद
- ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती देण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समिक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दहा वाजता जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.


















