न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- चिंचवड येथील यशस्वी संस्थेतर्फे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे आयोजित करण्यात येणारे विद्यार्थ्यांचे ‘यशोत्सव’ स्नेहसंमेलन यंदा लॉकडाऊनच्या परिस्थितीत घेता येणे शक्य नसल्याने ऑनलाईन पध्दतीने हे संमेलन साजरे करण्याच्या पवन शर्मा यांनी मांडलेल्या कल्पनेला संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनीही मान्यता दिली.
व्हाटस ॲपच्या माध्यमातून ही ऑनलाईन यशोत्सवची कल्पना सर्वांना पाठविण्यात आली. पवन शर्मा , डॉ. सुनिता पाटील व योगेश रांगणेकर यांच्या व्हाटस ॲप क्रमांकावर अनेकांनी आपापल्या कलाप्रकार सादरीकरणाच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज पाठविल्या. काहींनी चित्र व कविता लेखनही सादर केले.
तसेच आजच ‘यशोगाथा’ विशेषांकाचे पीडीएफ स्वरूपातील प्रकाशन करण्यात आले व विशेषांक सर्वांना व्हाटस ॲप आणि ईमेलद्वारे पाठविण्यात आला.
लॉकडाऊनमुळे आलेल्या मर्यादा लक्षात घेऊन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आलेला यशोत्सव सर्वांनाच आनंदाची अनुभूती देऊन गेला.


















