- ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाच्या दुकानांना दिली मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील जिल्हे घोषित केले आहेत. रेड झोनमध्ये १४ जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव यांचा समावेश आहे.
तर ऑरेंज झोनमध्ये १६ जिल्हे आहेत. त्यात रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
ग्रीन झोन ६ जिल्हे आहेत. उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा त्या समावेश केला आहे.
रेड झोनमधल्या व्यावसायिक आणि खासगी आस्थापनांना काम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आयटी, माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा, कॉल सेंटर, शीतगृह गोदाम, खासगी सुरक्षा सेवा, सुरु राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तुंची निर्मिती करणारे उत्पादन कारखाने, यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, ताग उद्योग, आयटी हार्डवेअरशी संबंधित उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे.
ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं खुली…
ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या गादीवर सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत


















