कोरोना बरा होतो; लोकांनी घाबरू नये…
राज्यातील पहिल्या कोरोनामुक्त पोलीसाची प्रतिक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी सुखद घटना घडली आहे. विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली येथील वास्तव्यास असणाऱ्या व कर्तव्यास पुणे शहर येथील एका मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या राज्यातील प्रथम कोरोनाबाधित ४२ वर्षीय पोलीस कॉंस्टेबल व त्यांची पत्नी कोरोनामुक्त झाली आहे. आज शनिवारी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर या दाम्पत्यांनी कोरोनावर मात केली. १४ दिवसांच्या उपचारानंतर या दाम्पत्यांचे घशातील द्राव्याचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. दोघाचेही १४ दिवसांचे आणि त्यानंतरच्या २४ तासांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या. त्यामुळे आज शनिवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
घरी आल्यानंतर येथील स्थानिक नगरसेविका विनया तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर व सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी या दाम्पत्यांनी वायसीएम रुग्णालयाचे आणि तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच कोरोना बरा होतो. लोकांनी घाबरू नये. शासनच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना केले.


















