न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- केंद्र शासनाने लॉकडाऊन वाढविल्यानंतर परगावी जाणा-या नागरिकांसाठी नियमावली जाहीर केली. परप्रांतियांसह राज्याच्या कानाकोप-यातील मजूर व कामगार अशा नागरिकांनी अर्ज भरून दिल्यानंतर तहसीलदार यांच्याकडून संबंधित नागरिकांना पास देण्यात येतील, असे सूचित करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली.
त्यामुळे माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी शनिवारी (दि. २) सकाळी नऊपासून पिंपरी – चिंचवड अप्पर तहसीलदार यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर येण्यास सुरूवात केली.
मात्र, परगावी व परजिल्ह्यातील व्यक्तींना जाण्यासाठी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नाही. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर गर्दी करू नये, अशा आशयाचा फलक तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आला. परंतु, त्या आधीच येथे नागरिकांचा वावर वाढून जमाव होऊन गर्दी होऊ लागली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व नागरिकांचा हिरमोड झाला.


















