न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून १८ फेब्रुवारी रोजी महापालिका सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्तांची एकूण तीन पदे असून, त्यातील एक पद महापालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्या पदावर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त, उप आयुक्त अथवा समकक्ष पदावरील किमान १० वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाणार असल्याचे म्हटले आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी दोन पदे ठेवण्यात आली आहेत.
शासनाच्या अधिकाऱ्यांच्या त्या दोन्ही पदांवर शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर ३० एप्रिल रोजी शासनाकडून साहेबराव गायकवाड यांची तिसऱ्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही बाब स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा पालिकेच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ही नियुक्ती रद्द करून, नियमानुसार तिस-या अतिरिक्त आयुक्त पदावर पालिकेतील एका सक्षम अधिका-याला बढती देऊन नियुक्त करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















