न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- राज्य सरकारने ३ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे तसेच पिंपरी शहरातील दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी सकाळी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र होते. संपूर्ण पुणे, पिंपरी – चिंचवड शहरात दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्ण वेगाने वाढत आहे. असे असले तरी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी, चिंचवड, निगडी, चिखली, पिंपरी, सांगवी, भोसरी या भागांमध्ये ठिकठिकाणी गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली. परिणामी संचारबंदी, फिजिकल डिसन्टिसिंगचा फज्जा उडवत नागरिकांकडून लाकडाऊनच्या पालनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.
काही ठिकाणी पोलिसांनी गर्दीला हुसकावून लावले. मात्र दहा वाजले तरी दुकाने काही उघडली नाहीत आणि मद्यप्रेमींचा घसा ओला झाला नाही. त्यामुळे काही नाराज मद्यप्रेमींना निराश होऊन घसा ओला न करताच माघारी फिरावे लागले. तर काहींनी उशिरापर्यंत रांगेत उभे राहून आपला घसा अखेर ओला केलाच.


















