न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना सुरु आहे. ही योजना बंद करुन त्रयस्थामार्फत नवीन विमा पॉलिसी आणण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही चालू असल्याचे समजते. कर्मचा-यांसाठी कोणतेही धोरण ठरवताना कर्मचा-यांना विश्वासात घेणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने कर्मचारी महासंघाला नवीन विमा पॉलिसीबाबत रविवारी (दि. ३) व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सादरीकरण दाखविण्यात आले. सादरी करणावेळी महासंघाच्या प्रतिनीधींनी नवीन पॉलिसी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली नाहीत.
खासगी कंपनीच्या प्रतिनीधींना समर्पक उत्तरे देता आली नाही. सादरीकरणावेळी अनेक त्रुटी, संदिग्धता आढळून आली. हा प्रश्न कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा हजारो लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. यामुळे महासंघाला आणि सर्व कर्मचा-यांना त्याबाबत अधिक स्पष्टता असणे आवश्यक आहे. परंतु, दुर्दैवाने असा कोणताही प्रकार याबाबत दिसून येत नाही. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निवडून येणा-या कर्मचारी महासंघासोबत चर्चा करुनच निर्णय घेण्याचे निर्देश आपणास दिले आहेत.
जोपर्यंत सर्व कर्मचा-यांना विश्वासात घेऊन नवीन योजनेबाबत असलेले सर्व संभ्रम दूर केले जात नाहीत. तोपर्यंत ही योजना लागू करण्यात येवू नये. त्यास कर्मचारी महासंघाची मान्यता असणार नाही. हे पत्र दिवाणी न्याय प्रक्रिया कलम ८० (क) नुसार नोटीस समजावी, असे पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अबंर चिंचवडे आणि महासचिव सुप्रिया सुरगुडे-जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.


















