- आमदार जगताप यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने करारनामाद्वारे भाडेतत्त्वावर शिवनेरी, शिवशाही बसेस घेतलेल्या आहेत. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच पीएमपीएमएलकडेही आजमितीला दोन हजारहून अधिक बसेस आहेत. मात्र, कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहेत. राज्य परिवहन महामंडळ व पीएमपीएमएल च्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील ठेकेदारांच्या बसेस, या भाडे तत्त्वावर घेताना करण्यात आलेल्या करारानुसार बस मार्गावर धावत नसल्या तरीही, ठरलेली रक्कम संबंधित ठेकेदारांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे दोन्ही संस्थाना भाडे तत्त्वावरील बस बंद असूनही ठेकेदारांना कोट्यवधी रुपये मोजावेच लागणार आहेत.
अशा स्थितीत बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक कामगार आणि मजूर शहरात अडकून पडले आहेत. त्यातील अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे हे नागरिक शहरात अडकले आहेत. या नागरिकांना मूळगावी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी शिवनेरी, शिवशाही या बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सरकारने करावी.
तसेच पिंपरी चिंचवड शहरात बाहेरच्या जिल्ह्यातील हजारो नागरिक राहत आहेत. यातील अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे हे नागरिक शहरात अडकून पडले आहेत. या नागरिकांना मूळगावी जाणे सोयीचे व्हावे यासाठी पीएमपीएमएलच्या भाडे तत्त्वावरील बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सरकारने करावी. तसे आदेश तत्काळ संबंधित यंत्रणांना देण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पत्राद्वारे ई-मेलच्या माध्यमातून केली आहे.

















