न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- शहरात येणारे नागरिक, कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि इतर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास गन्हा नोंदविला जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी रविवारी (दि. १०) रोजी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची शासकीय, खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार परराज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक व इतर व्यक्तींना जिल्ह्यात किंवा शहरात येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. शहरामध्ये आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्या व्यक्तींना आवश्यकतेप्रमाणे होम किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जात आहे.
शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी पोलिस, महसूल व वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत थर्मल गन व इतर तपासणी करून, क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. तसेच, माहितीपत्रकनुसार देण्यात येत आहे. क्वारंटाईनचे उल्लंघन केल्यास उल्लंघनाच्या दिवसापासून पुढे १४ दिवस त्यांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाणार आहे. परवानगी नसलेल्या वाहनांतून प्रवास केल्यास त्या व्यक्तीलाही क्वारंटाईन केले जाणार आहे. इतर राज्यातून येणारी व्यक्ती कंटेन्मेंट झोन म्हणजे रेड झोनमधून आल्याची शहानिशा केली जाणार आहे. तसे आढळल्यास १४ दिवस अॅक्टिव्ह क्वारंटाईन व १४ दिवस पॅसिव्ह क्वारंटाईन केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अंतर्गत पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची माहिती पालिकेच्या सारथी हेल्पलाईनच्या ८८८८००६६६६ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.


















