न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- संचारबंदीसाठी विचारविनिमय करुन आवश्यकतेनुसार आणखी उपाय योजना प्रशासनामार्फत केल्या जातील. सर्व नगरसदस्यांनी व्हिडीओद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी सूचना कराव्यात. ज्या भागामध्ये जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील. अशा भागांची प्राधान्याने दखल घेतली जाईल. औषध फवारणी केली जाईल. दुकानांना चालू करण्याची परवानगी देताना योग्य ती खबरदारी घेतली जाईल. प्रशासन आपल्या सोबत आहेच, आपणही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भात आज (सोमवारी) सर्वपक्षीय गटनेत्यांची महापौर दालनात झालेल्या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, प्रा. उत्तम केंदळे, नगरसदस्या कमल घोलप, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नागरिकांकडून पालन होत नसल्यास भविष्यात प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास संबधित दुकानदार व ग्राहक यांच्यावर कलम १४४ अंतर्गत कार्यवाही करावी अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिल्या.













