न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- संपूर्ण जगाला एका सूक्ष्मातीसूक्ष्म कोविड (कोरोना) विषाणूने हादरवून सोडले आहे. आज तरी आपल्यापुढे केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचे व ईतरांचे प्राण वाचवणे हा एकच मार्ग आहे. या पार्श्वभूमीवर, आधुनिक युगातले महान संत व आदर्श युगपुरूषोत्तम श्री श्री ठाकुर अनुकूलचंद्र यांच्याशी युक्त असलेला समाज हा सेवा, विकास, व ऊन्नती या तत्वप्रणालीवर आधारीत ‘सत्संग’ संघटनेमार्फत स्थानिक व देश पातळीवर मदत कार्य करत आहे.
आज भारत व विदेशात मिळून जवळपास ५००० सत्संग केंद्र, विहार, श्रीमंदिर, व उपयोजना केंद्र आहेत जे विद्यमान सत्संग आचार्यदेवांच्या मार्गदर्शनानुसार सन्निती, सदाचार, व नि:स्वार्थ सेवा ही मूल्ये जोपासत कार्य करत आहेत. एप्रिल महिन्यात सत्संग देवघर या प्रतिष्ठानामार्फत केंद्र सरकारला (PM CARES Fund) १० कोटींचा मदतनिधी ऊपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय पंतप्रधानांनी सत्संग कार्याबद्दल कौतूक व कृतज्ञता व्यक्त केली.
‘सत्संग देवघर’ या लोककल्याणकारी प्रतीष्ठानची ‘सत्संग पुणे’ ही सेवाभावी शाखा असून या शाखेमार्फत पुण्यातील सत्संगी गुरुबंधू व भगिनी आजच्या कोविड संकटात सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत पुणे व आसपासच्या परिसरातील अनेक कुटुंबांना आर्थिक व सेवा सहाय्य करत आहेत. या मदतीचा ओघ महाळुंगे येथिल १० मजूर कुटूंबे, निखोजे (चाकण) खेडेगावातील २२ कुटुंबे, हिंजेवाडी येथिल १०, बालेवाडी येथिल १२, तर भोसरी भागातील ४ कुटूंबे यांपर्यंत पुरवला गेला.
यात मजूर, बांधकाम, रोजंदारी, सुरक्षारक्षक, घरगुती ऊद्योग असे सर्व स्तरातील घटक आहेत. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवताना, पुणे सत्संगीयांनी आपल्या भोवतालच्या परिसर व समाज बांधवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता आणि या कोविड च्या संकटात ते एकटे नाहीत हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी ऊचललेली पावले, आपल्या सर्वांनाच प्रेरणा देतील यात शंका नाही.













