- पिंपरी वाघेरे, पिंपळे गुरव व मोशीतील पाच रुग्ण कोरोनामुक्त…
- रहाटणीतील छत्रपती चौक,चिंचवड स्टेशनचा आनंदनगर परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार ०४ पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. हे चार जण वयोवृद्ध असून, त्यांची वयं अनुक्रमे ५२, ६०, ६५, ७० अशी आहेत. आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघी येथील रहिवासी असून, ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात व पुणे मनपा मधील रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे आजपर्यंत सकारात्मक रुग्ण संख्या १७९ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेले कोविड-१९ बाधित रुग्ण संख्या ५४ वर पोहोचली आहे.
आज पिंपळे वाघेरे, पिंपळे गुरव व मोशी येथील रहिवासी असलेले पाच कोविड-१९ बाधित रुग्ण दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, औंध रुग्णालय पुणे व वायसीएम रुग्णालय येथे दाखल होते. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत महापालिका हद्दिमधील ११६ जण कोरोनामुक्त झालेले आहेत.
दरम्यान छत्रपती चौक, रहाटणी (श्रीनंदा क्लासिक सिध्दीविनायक मंदिर–रेणुका माता मंदिर–बसेरा रेसिडन्सी–ओंम मेडिकल स्टोअर–जीवन क्लिनीक–छत्रपती चौक -श्रीनंदा क्लासिक), आनंदनगर, चिंचवड स्टेशन (चिंचवड स्टेशन रोड–स्टार बेस्ट बेकरी–जुना मंबई पुणे हायवे–सदगुरु स्नॅक्स–कार्निव्हल सिनेमा मागची बाजू– प्रिमियर कंपनी मागील बाजू–मालधक्का भिंत–मालधक्का रोड –चिंचवड स्टेशन रोड)
हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.













