- महापालिकेकडे पाठपुरावा करून विक्रेत्यांना मिळवून दिले पास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी भाजी विक्रीची सोय केली आहे. कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे, यासाठी शहरातील निरनिराळ्या ठिकाणी एकाच छताखाली फळे, भाजीपाला विक्री केंद्राची उभारणी केली. मात्र, या ठिकाणी केवळ काही निवडक फळभाजी विक्रेत्यांनाच पास देण्यात आले आहेत.
त्यामुळे शहरातील व चिखली-कुदळवाडीतील बहुतांश फळ-भाजीविक्रेते अडचणीत सापडले होते. त्यांच्यासाठी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यांनी पुढाकार घेतला आहे. यादव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेकडे कागदोपत्री पाठपुरावा करून कुदळवाडीतील अनेक फळभाजी विक्रेत्यांना परवाना (पास) काढून दिला आहे.
याबाबत माहिती देताना यादव म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी फळे, भाजीपाला विक्री केंद्रास मान्यता दिली आहे.
मुळात भाजीपाला विक्रीकेंद्र हे नागरिक रहात असणाऱ्या परिसरापासून दूरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे निरनिराळ्या भागातून लोक भाजी खरेदीसाठी रस्त्यावर येतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. शहरातील बरीच गोरगरीब मोशीतील मंडईत जाऊन, भाजीपाला खरेदी करतात. आपला जीव धोक्यात घालून, केवळ लोकांची सेवा व्हावी या भावनेने भाजीपाला विक्री करून, लॉकडाऊन काळात आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
मात्र, महापालिकेचा अतिक्रमण विभाग पास नसल्यामुळे गोरगरीब भाजीपाला विक्री करणाऱ्यांच्या मुळावर उठला होता. त्यामुळे चिखली-कुदळवाडीतील फळ-भाजी विक्रेत्यांनी पास काढून देण्याची मागणी केली. त्यासाठी महापालिकेकडे अर्ज करून, पात्र फळ-भाजी विक्रेत्यांना पास उपलब्ध करून दिले आहेत. कुदळवाडी परिसरातील ज्या फळ-भाजी विक्रेत्यांना पास हवे असतील त्यांनीही कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन यादव यांनी केले आहे.















