न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवडची रहिवासी असलेली मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने करोनाच्या या परिस्थितीत आपलं सामाजिक भान जपलं आहे. आज वाढदिवसानिमित्त तिने महापालिका रुग्णालयाला ९५ पीपीई किट दान केले.
ती स्वतः दुबईमध्ये असल्याने तिचे वडील मनोहर कुलकर्णी आणि भाऊ अतुल कुलकर्णी यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येऊन पीपीई किट प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
तिचे वडील मनोहर कुलकर्णी आणि भाऊ अतुल कुलकर्णी, कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आज सोमवारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, भांडार व्यवस्थापक राजेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून किट सुपूर्द केल्या. सोनाली सध्या लॉकडाउनमुळे दुबईला अडकली आहे, मात्र ती भारतातच्या करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यातूनच तिने करोना योद्धे असलेल्या डॉक्टरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
सोनालीने एका व्हिडिओद्वारे याची माहिती दिली असून ती म्हणते, “मी पिंपरी-चिंचवड शहरात राहते, शहरातील अनेक करोनाबाधित रुग्ण हे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचं मी ठरवलं होतं. याकामी माझ्या अनेक मित्रांनी मदत केली असंही सोनालीनं स्पष्ट केलं आहे.















