न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- संरक्षण क्षेत्राचे व्यावसायीकरण आणि कामगार कायद्यांतील बदल या केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या भारतीय संरक्षण कामगार संघाने सोमवारी आंदोलन केले.
देहूरोड येथील दारूगोळा कारखान्याच्या प्रवेशद्वारापाशी सायंकाळी हे धरणे आंदोलन झाले. भारतीय मजदूर संघ ही रा. स्व. संघ परिवारातील कामगार संघटना असून या संघटनेच्या आंदोलनातून कामगारांचा असंतोष व्यक्त झाला आहे. मजूर आणि कामगारांच्या मागण्यांसंदर्भात भारतीय मजदूर संघातर्फे बुधवारी (२० मे) देशव्यापी आंदोलन करून पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदन पाठविले जाणार आहे.
केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये केलेले बदल हे कामगारविरोधी असल्याची टीका भारतीय मजदूर संघाने केली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांनी या बदलांचा स्वीकार केला असून त्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे. संरक्षण उद्योगाचे निगमीकरण करण्याला संघाचा विरोध आहे. संरक्षण उद्योगामध्ये थेट परदेशी भांडवल ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या क्षेत्रात अशा स्वरूपाचे निर्णय घेण्याविरोधात भारतीय संरक्षण कामगार संघाने सोमवारी आंदोलन केले, अशी माहिती संघाचे सरचिटणीस अशोक थोरात यांनी दिली.















