न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने सांस्कृतिक धोरणांतर्गत अनेक संस्कृतिक उपक्रम राबविले गेले आहेत. हे उपक्रम राबवताना पिंपरी-चिंचवडमधल्या स्थानिक कलाकारांना मनपाने वेळोवेळी संधी दिलेली आहे. परंतु, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या सर्व कलाकारांना पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने मदतीचे धोरण अवलंबून त्यांना मदत करणे गरजेचे आहे, अशी मागणी पिंपरी चिंचवड कलारंग संस्कृतिक कला संस्थेचे अध्यक्ष तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त व महापौर यांच्याकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे.
या पत्रात गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यक्रम, रेकॉर्डिंग, शिकवणी असे सर्व स्त्रोत बंद झाल्याने शास्त्रीय नृत्य सादर करणारे साथ-संगत करणारे सहकलाकार यांचे उत्पन्न थांबले आहे. केवळ कलेवरील उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांकडे सहा ते आठ महिने आगामी कसे काढायचे हा प्रश्न आहे.
कार्यक्रमास लागणारे प्रकाश योजनाकार, ध्वनी योजना कार, मेकअप आर्टिस्ट पडद्यामागील कलाकार सर्वच अडचणीत आहेत. पिंपरी-चिंचवड मनपाने कला-क्रीडा संस्कृतीक धोरणा अंतर्गत आपली जबाबदारी म्हणून या सर्व कलाकारांना आर्थिक अथवा इतर पद्धतीने मदत करावी, असे म्हटले आहे.















