आनंदनगरमधील अन्नधान्य व किराणा मालाची दुकाने उघडणार – महापालिका आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या आनंदनगर परिसरात अखेर नागरिकांचा उद्रेक पहावयास मिळाला. आनंदनगर परिसरात कोरोनाचे तीस रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश केला आहे. येथील सर्व जीवनावश्यक सुविधा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. किराणा मालासह अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही घटना बुधवारी ( दि. २०) रोजी चिंचवड स्टेशन येथील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आनंदनगरमध्ये घडली. जमाव दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर उतरला. आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत, अशी मागणी या जमावाने लावून धरली.
याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. वाढलेला जमाव पाहून त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच सुरक्षित अंतर राखून प्रत्येकाने आपले प्रश्न मांडावेत, असे सांगितले. तेवढ्यात आमदार अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शीतल शिंदे व पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. जमावाने आपल्या मागण्या आणखीनच उग्र स्वरात व बेशिस्तपणे त्यांच्यासमोर मांडल्या व महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत, अशा घोषणा केल्या. दरम्यान नगरसेवक शैलेश मोरे यांनी पुढाकार घेत, सर्वाना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. या आधीही मी तुमच्यासाठी धावून आलेलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, सर्वकाही तुमच्या मनाजोगे होईल, असे आवाहन केले. त्यावेळी जमाव शांत झाला.
तसेच आमदार आण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त हर्डीकर, नगरसेवक शीतल शिंदे यांनीही जमवाशी संवाद साधत, महापालिकेच्या वतीने सर्वांना अन्नधान्य, जेवण मिळेल. तसेच परिसरातील किरणा मालाची दुकाने उघडली जातील, असे आश्वासन दिले.
आनंदनगर परिसरात साडेतीन हजारांपेक्षा अधिक घरे असून, येथे १५ हजार नागरिक राहतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद आहेत. येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी माझ्या वतीने जमेल तशी मदत येथील लोकांना केली. मात्र, प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे मदत पोहोचविण्याकामी मर्यादा येतात. त्यामुळे आज येथील जमाव रस्त्यावर उतरला. करोना प्रसाराचा धोका निर्माण झाला होता. आमदार आण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे स्वतः आनंदनगरमध्ये दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच परिसरातील किराणा मालाची दुकाने उघडतील. अन्नधान्य व जेवणाची सोय होईल, असे आश्वासन दिले. झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे महापालिकेने सतर्कता बाळगणे अत्यावश्यक आहे.
– शैलेश मोरे, स्थानिक नगरसेवक – पिं. चिं. मनपा.