- नियम व अटींचे पालन करणाऱ्यालाच मिळणार दुकाने उघडण्याची परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोविड १९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. तथापि, लॉकडाऊन ४.० मध्ये शिथिलता देण्यात आलेली असून अनेक व्यवसाय सुरू करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, त्याकरिता काही निर्बंध घालून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्वपरवानगीने असे व्यवसाय सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार शहरामध्ये केशकर्तनालयाचे / ब्युटी पार्लर / सलून व्यवसायदेखील सुरु करावयाचे विचाराधीन असून, त्याकरिता केशकर्तनालयांकरिता आवश्यक ते निर्बंध घालून व्यवसाय सुरू करता येईल.
यास्तव केशकर्तनालयांसाठी / ब्युटी पार्लर / सलूनकरिता मानक कार्यप्रणाली निश्चित करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या केशकर्तनालयाचा / ब्युटी पार्लर / सलून व्यवसाय करणा-या आस्थापनांना खालील अटी व शर्तीच्या अनुषंगाने व्यवसाय सुरु करता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली.
अटी व शर्ती :-
१) शहरामध्ये केशकर्तनालयाचा / ब्युटी पार्लर/ सलून व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून व्यवसाय सुरु करण्याकामी परवानगी घेतलेल्या व त्याचे नियमानुसार दरवर्षी नुतनीकरण केलेल्यांना व्यवसाय सुरू करता येईल.
२) सदर परवाना वितरित करण्याचे व नुतनीकरणाचे कामकाज हे क्षेत्रीय कार्यालयांचे स्तरावर सहा आरोग्याधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल.
३) नव्याने केशकर्तनालये/ ब्युटी पार्लर/ सलून सुरु करण्यापूर्वी सोबत संलग्न करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार नव्याने परवानगी देणेत येईल.
४) महानगरपालिकेचा परवाना नसलेल्या अथवा परवाना नुतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करता येणार नाही.
तसेच सोबत संलग्न करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचे पालन करणे संबंधित आस्थापनांना बंधनकारक राहील. सदर मानक कार्यप्रणालीचे पालन न करणा-या व्यावसायिकांना अथवा त्याचे उल्लंघन करणा-या आस्थापनांची परवानगी रद्द करण्यात येईल. अधिकृत बांधकाम परवानगी असलेल्या इमारतीमधील केशकर्तनालये प्रथमतः सुरू करण्यात येईल. तथापि तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या संरचनेतील आस्थापना सुरू करता येणार नाही. पुरेसा सुर्यप्रकाश व मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था उपलब्ध असलेले केशाकर्तनालय / ब्युटी पार्लर / सलून यांनाच सुरू करता येईल.
• दुकानामध्ये असलेल्या दोन खुर्च्यांमध्ये किमान १ मिटरचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तथापि, ज्या ठिकाणी ३ खुर्च्या आहेत त्याठिकाणी एका वेळी १ ग्राहक, ज्या ठिकाणी ५ खुर्च्या आहेत, त्याठिकाणी २ ग्राहक व ज्याठिकाणी ५ किंवा अधिक खुर्च्या आहेत, त्याठिकाणी ३ ग्राहकांना एकावेळी बसविण्याची मुभा राहील.
• केशकर्तनालय । ब्युटी पार्लर / सलून यामध्ये येणा-या ग्राहकांसाठी दुकानाबाहेर संपर्कविरहित सॅनिटायझर डिस्पेन्सर (foot operated or no contact sanitizer dispenser) बसविणे आवश्यक राहील.
• प्रत्येक कामगाराने केशकर्तनापुर्वी व नंतर हात धुणे व निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहील.
• केशकर्तनालयामध्ये येणा-या प्रत्येक ग्राहकाने व तेथे काम करणा-या व्यक्तींनी मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. ग्राहकांना केवळ केशकर्तनावेळी अथवा शेव्हींग करताना मास्क काढणे अनुज्ञेय राहील.
• ग्राहकारीता प्रत्येक वेळी तोंड पुसणे इ. करीता नविन नॅपकीन वापरण्यात यावा अथवा वापरण्यात आलेला नॅपकिन प्रत्येक वापरानंतर सोडिअम हायपोक्लोराईट (१ %) मध्ये किमान ३० मिनिटे भिजवून त्यानंतर धुतलेला व पूर्णत: वाळलेला असणे आवश्यक आहे. ग्राहकांना स्वत : चे नॅपकिन आणण्यास प्रवृत्त करणे योग्य राहील.
• केशकर्तनाकरिता अथवा शेव्हींगकरिता वापरण्यात येणारे सर्व साहित्य उदा. कात्री, उस्तरा इ. प्रत्येक वापरापूर्वी सोडिअम हायपोक्लोराईट (०.१ %) द्रावणामध्ये ब्लिचिंग डेटॉल किंवा तत्सम द्रावणामध्ये निर्जतूक करुन वापरावे.
• शेव्हींगकरिता वापरण्यात येणारे ब्रश प्रत्येक वेळी धुणे व निर्जंतुक करणे शक्य नसल्याने शेव्हींग करिता फोम अथवा जेलचा वापर करावा. ब्रशचा वापर करणे वर्जित राहील.
• प्रत्येक ग्राहक खुर्चीवर बसण्यापूर्वी त्या खुर्चीचे सोडिअम हायपोक्लोराईट अथवा तत्सम द्रावणाद्वारे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
• ग्राहकांना केशकर्तनालयासाठी अथवा शेव्हींसाठी वेळ निश्चित करुन ठराविक वेळेमध्येच बोलविण्यात यावे. दुकानामध्ये अथवा दुकानाबाहेर गर्दी होता कामा नये
• चेहरा अथवा डोक्याची मसाज करण्याकरिता येणा-या ग्राहकांना मसाज करतांना डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरणे बंधनकारक राहील ग्लोव्हजन वापरता मसाज करण्यात येऊ नये, ग्लोव्हज न वापरता मसाज करण्यात येऊ नये.
• संपूर्ण केशकर्तनालयाचे दर ४ तासांनी सोडिअम हायपोक्लोराईट ( १ % ) द्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच दर ४ तासांनी जमीन / फरशी पुसणे आवश्यक राहील.
• केशकर्तनालयाचे आत तसेच बाहेर सामाजिक अंतराचे ( Social distancing) पालन करणे बंधनकारक राहील.
• केशकर्तनालयाकरिता वेळ स. ९ .०० ते सायं. ५.०० अशी राहील.















