- भोसरीत घरखर्चासाठी पैसे नसल्यामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- कोरोनाने सर्वसामान्य नागरिकांना मेटाकुटीस आणले आहे. सर्वच व्यवहार ठप्प असल्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपासमार टाळण्यासाठी काहीजण विकृत मार्ग जवळ करताना दिसत आहेत. अशीच घटना भोसरी परिसरात घडली.
जवळचे पैसे संपल्याने पत्नीने घरखर्चासाठी पतीला पैसे मागितल्याने पती-पत्नीत किरकोळ कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला. पत्नी बाहेर गेल्यानंतर पतीने दार बंद करून घरातच स्वतःला गळफास लावून घेतला. काही वेळाने पत्नीने दार उघडण्याचा प्रयत्न केला असता, दार आतून बंद असल्याचे तिच्या निदर्शनास आले. पतीला दार उघडण्यास सांगूनही आतून प्रतिसाद आला नाही.
पत्नीने घराची खिडकी फोडली तर समोर पतीने गळफास लावून घेतल्याचे तिला दिसले. त्यामुळे पत्नीने शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलवून दार तोडले व पतीला खाली उतरवून घेतले. पतीला खासगी रुग्णालयात दाखल केले असून तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, चौकशी सुरु आहे. ही घटना रविवारी (दि. २४) रोजी रात्री दहा वाजता भोसरीतील संत तुकाराम नगर परिसरात घडली. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव प्रदीप गुलाबराव शेलार असून, वय ४२ वर्षे आहे. त्यांना दोन मुले आहेत. ते व्यवसायाने पेंटर आहेत.













