न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने राष्ट्रपुरूष महाराणा प्रतापसिंह यांची तिथी प्रमाणे ४८० वी जयंती निगडी येथील महाराणा प्रताप उद्यानात अत्यंत साध्या पध्दतीने शासनाच्या नियमात राहून व सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ठरावीक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
महाराणा प्रताप यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या उद्यानाला राजपूत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ करून पुर्णपणे औषधीने सॅनिटायझर करून घेतले होते. उपस्थित सर्वांना यावेळी सॅनिटायझर आणी मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपुरूष महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारतमाता यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांनी जनतेला लाॅक डाऊनच्या नियमांच पालन करण्याच्या सुचना करत प्रत्येकाने स्वत:ची आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
श्रीराम परदेशी यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जिवन प्रवासावर सुंदर असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, उद्यान सहाय्यक ज्ञानेश्वर कांबळे, राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष ठा. शिवकुमारसिंह बायस, सुरेश सुर्यवंशी, श्रीराम परदेशी, किरणसिंह परदेशी, गणेशसिंह राजपूत, दिनेशसिंह राजपूत, कोमलसिंह पाटील, जतीन परदेशी, नितिन चिलवंत, राजकुमार परदेशी, सुभाष शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले.













