न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पावसाळीपुर्व नालेसाफसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. तथापि, नालेसफाई करताना महापालिकेमार्फत सफाई कर्मचा-यांना मास्क, हातमोजे, गमबुट, साबण आदी सुरक्षा साधने नियमिततपणे दिले जात नाहीत. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर महापालिकेने आरोग्य कर्मचा-यांची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड.सागर चरण यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात अॅड. सागर चरण यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीत सध्या पावसाळयापुर्वीच्या कामांना वेग आला आहे. १५ जुनपुर्वी नालसफाई पुर्ण करावी, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. त्यानुसार, आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना महामारीच्या काळातही जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे काम करत आहेत. तथापि, नालेसफाई केवळ यांत्रिक पद्धतीनेच करणे बंधनकारक असतानादेखील जोखमीची कामे अजुनही हातानेच केली जात आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करण्यासाठी कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने २०१३ मध्ये संमत केलेल्या कायद्याचा भंग होत आहे.
याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांच्याकडेही दाद मागण्यात आली आहे. नालेसफाई करताना पिंपरी – चिंचवड शहरात आजही सफाई कामगारांना हाताने मैला उचलावा लागतो. हाताने मैला उचलणे ही अमानवी पद्धत आहे. आजही अनेक भागात हाताने मैला साफ करण्याची अमानवी पद्धत अस्तित्वात असल्याची बाब लाजिरवाणी असल्याचे अॅड. सागर चरण यांनी म्हटले आहे.