न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने लॉकडाऊनच्या नियमामध्ये शिथिलता आणून शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. पिंपरी कॅम्पमध्येही बाजारपेठ परिसरातील दुकानांना सम व विषम पद्धतीने दुकानं खुले करण्यास सांगितले होते. मात्र, या परिसरातील वाढत्या रुग्णांची संख्या, महापालिकेकडून जाहीर केलेला कंटेन्मेंट झोन आणि होणारी गर्दी यामुळे परिसरातील बाजारपेठ आज २७ ते ३१ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढले आहेत.
महापालिका आयुक्तांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासाठी वेळही ठरवून दिली. बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोनाची चिंता व्यक्त करण्यात येत होती. पिंपरीतील भाटनगर, बौध्दनगर, वैष्णदेवी माता मंदिर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. या प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळील पिंपरी कॅम्प, शगुन चौक, कराची चौक, आर्य समाज चौक, साई चौक, गेलॉर्ड चौक, रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या बाजारपेठेतील दुकाने आणि ग्राहकांकडून अटी-शर्तीचे उल्लंघन होत होते.
त्यामुळे प्रशासनाने या परिसरातील सर्व दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. दरम्यान, आधीच गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने तोटा सहन कराव्या लागलेल्या दुकानदारांना पुन्हा दुकाने बंद करावी लागली. आता पुढील ३१ तारखेनंतर तरी दुकाने उघडण्याची परवानगी मिळेल का या चिंतेत व्यापारी आहेत.


















