न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर-२ (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे.
सामाजिक शास्त्रे पेपेर-२(भूगोल) या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.
तर, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अऩ्य विषयांच्या लेखी, तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे, राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत कळवले आहे.











