न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन आरोपींना वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आणण्यात आले होते. त्यावेळी तीनही आरोपींनी पोलिसांशी वाद घातला. झटापटीत कृष्णा सोनवणे हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याला पोलिसांनी मंगळवारी रात्री मोशी येथून जेरबंद केले.
आरोपी रुग्णालयातून पळून गेल्यानंतर मोशी येथे गेला. तेथे त्याच्या ओळखीच्या काही जणांकडून पैसे घेऊन बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील कर्मचारी गणेश सावंत यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी कृष्णा सोनवणे याला जेरबंद करण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली. कृष्णा उत्तम सोनवणे (वय १९, रा. तापकीर मळा, चर्चसमोर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.











