न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- सध्याची दरोरोजची कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जुन महिन्याच्या अखेरीस पिंपरी चिंचवड शहर धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता मात्र बळावली आहे. दरोरोज १५ पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाने बाधित होत आहेत, संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पुणे आणि मुंबई ह्या शहरांसाठी पुढील २ महिन्यांचा कालावधी अतिशय कठीण परिस्थितीचा असणार आहे. राज्य प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर मात्र संसर्ग वेगाने पसरण्याची शक्यता आहे. शहरातील सध्याची परिस्थिती पाहता , सोशल डिस्टन्स ची ऐशी तैशी सुरू आहे, बाजारात आणि मंडई सारख्या ठिकाणी नागरिक अतिशय बेपर्वाहिने खरेदी करीत आहेत. लॉक डाऊन आता नावापूरतेच राहिलेले आहे. “धोक्याची घंटा” वाजली असून अजूनही प्रशासनाने कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. अश्याच पद्धतीने जर वाटचाल सुरू राहिली तर मात्र परस्थिती जुलै २०२० पर्यंत हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. शासकीय रुग्णालयाची बेडची संख्या येत्या काही दिवसात संपुष्टात येईल. खाजगी रुग्णालये आरक्षित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यासाठी प्रशासनाने आताच हालचाल सुरू करणे क्रमप्राप्त राहील. शहराच्या आयुक्तांनी काही कठीण निर्णय घेणे आवश्यक आहे.
आजची परस्थिती पाहता शहरात कोरोना बधितांनी ४५० चा आकडा पार केलेला आहे. १८ जणांचा दुर्दैवी बळीही गेलेला आहे. ह्याकरता शहराचा भौगोलिक विचार पाहता मुंबई पुणे महामार्गामुळे निर्मित असलेला भूभाग पूर्व व पश्चिम असला विभागला जातो. २०१७ महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग रचनेप्रमाणे पूर्व भागात १ ते १५ हे प्रभाग व १९,२० आणि २५ असे तीन प्रभाग अभ्यासले असता एकूण १८ प्रभाग पूर्व विभागात येतात व १६ ते ३२ मधील एकूण १४ प्रभाग पश्चिम भागात मोडतात, अश्या पद्धतीने ३२ प्रभागात एकूण ६४ खाजगी शासनाची परवानगी प्राप्त हॉस्पिटल्स आरक्षित करणे आता आवश्यक ठरते, म्हणजे जून – जुलै मध्ये कोरोना ने डोके वर काढल्यास त्या त्या प्रभागात सहजपणे बाधितांना उपचार शक्य होतील.
नकाशाची पडताळणी व सद्यस्थितीचा अभ्यास केला असता प्राधिकरण, वाल्हेकरवाडी सारख्या ‘ग्रीन झोन’ परिसरातही आता कोरोनाने शिरकाव केलेला दिसून येत आहे. पूर्व आणि पश्चिम अश्या दोनही भागात कोरोना ने प्रवेश केलेला आहे. संभाव्य धोका पाहता प्रत्येक प्रभागात हॉस्पिटल्स महापालिकेने आरक्षित करणे आवश्यक आहे.अन्यथा रुग्णांची संख्या अचानक वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळणे दुरापास्त ठरेल. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक प्रभागात महापालिकेचा दवाखाना असल्याकारणाने तेथे नियंत्रण संपर्क कक्षही उभारता येईल व एक महापालिकेचा वैदयकीय अधिकारी व्यवस्थितपणे आरक्षित हॉस्पिटलचे काम नियंत्रणात ठेवू शकेल.
शहरात २८ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची घनता आहे, झोपडपट्यांची संख्याही जास्त आहे. अवैध धंद्यांनीही डोके वर काढले आहे, त्यामुळेही स्लम विभागात धोकादायक पद्धतीने गर्दी वाढत आहे. अश्या ठिकाणी कोरोनाने शिरकावही केलेला आहे. त्यामुळे आता येणारा लॉकडाऊन चा ‘पाचवा टप्पा’ आयुक्तांनी अतिशय कडक पद्धतीने राबविणे क्रमप्राप्त ठरेल. अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग वेगाने पसरेल, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.