न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक झोपडपट्ट्यांत आणि दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने शहरातील २० झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी वस्तीबाहेर मंडप टाकण्यात आला आहे.
शहरातील खराळवाडी, रूपीनगर, गांधीनगर, इंदिरानगर, आनंदनगर, भाटनगर, बौध्दनगर, नेहरूनगर यासह अनेका दाट लोकवस्ती कोरोना रुग्ण सापडले आहे. मात्र, आनंदनगर, भाटनगर, बौध्दनगर या भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाची चाचणी अहवाल येण्यास २ ते ३ दिवस जात आहेत. या विलंबामुळे हाय रिस्क कॉन्टक्टमधील इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयितांमध्ये आणि दाट लोकवस्तीत संसर्ग अधिक वाढण्याचा धोका आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने दाट लोकवस्ती व झोपडपट्टीतील सर्व रहिवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी मंडप उभारला जाणार असून, पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. या तपासणीमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. शहरातील २० मोठ्या व दाट झोपडपट्ट्यांची निवड पालिकेने केली आहे. या झोपडपट्ट्यांच्या बाहेर मंडप टाकून तेथील रहिवाशांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे संशयित व कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या नागरिकांचा शोध घेणे शक्य होणार आहे. तसेच त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यास मदत होणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.