न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. जून. २०२०) :- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाणस्मृती रुग्णालयात करोना बाधितांसाठी केलेला १५ खाटांचा अतिदक्षता विभाग फुल्ल झाला आहे. तिथे नवीन रुग्ण घेण्यासाठी जागा शिल्लक राहिली नसल्याने रुग्णालय प्रशासनाने येथील ६०२ क्रमांकाचा वॉर्ड अतिदक्षता विभागात रुपांतरित केला आहे.
त्यामुळे ज्या करोनाबाधित रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज लागेल, त्यांची सोय होऊ शकणार आहे. वायसीएम रुग्णालय हे 750 खाटांचे आहे. मात्र, करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी दोन खाटांमध्ये किमान दीड मीटरचे अंतर ठेवावे लागते. तसेच, प्रत्येक वॉर्डमध्ये ३० रुग्णच ठेवावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णालयात सध्या ५७५ रुग्णच दाखल करून घेण्याची क्षमता आहे.