- मुंबईच्या धर्तीवर विद्यावेतनात वाढ द्या; डॉक्टरांचे रुग्णालयासमोरच आंदोलन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- आम्ही जीवावर उदार होऊन कोरोनाविरोधात लढत आहोत. आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जाते. मुंबई महापालिकेप्रमाणे आम्हाला विद्यावेतनात वाढ द्यावी, यासाठी आज सोमवारी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टरांनी रुग्णालयासमोरच आंदोलन केले. तसेच महापालिका प्रशासन विद्यावेतन वाढ देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वायसीएममधील ३३ डॉक्टरांना ऑगस्ट २०१८ पासून २४ हजार ८०० रुपये तुटपुंजे विद्यावेतन मिळत आहे. विद्यावेतन कमी मिळत असल्याने शहरात राहणे कठीण बनले आहे. मुंबई महापालिकेने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे. आम्ही एमबीबीएस पदवी प्राप्त असून, इतर निवासी डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांच्यासारखेच आणि त्यांच्या इतकेच काम करत आहोत, तरीही विद्यावेतनात फार मोठी तफावत आहे, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.