- महासभेत नगरसेवकांची महापालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हद्ययरोग, कर्करोग, किडनी, मेंदूचे आजार अशा दुर्धर व्याधी असलेल्या व्यक्तींना ५ हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदत महापौर निधीतून केली जाते. पुणे महापालिकेच्या धर्तीवर किमान एक लाख रुपयांची मदत केली जावी. तसेच, महापौर निधी वाढवावा, अशी मागणी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. सभा गुरूवारी (दि. ५) झाली.
सभेत राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या की, पुणे पालिकेच्या वतीने दुर्धर व्याधी असलेल्या रुग्णांना १ लाखाची मदत केली जाते. आपण फक्त पाच हजार रुपये सहाय्य देतो. त्यांचा रुग्णालयाचा खर्च दोन लाखाच्या पुढे असतो. पाच हजारांच्या धनादेशासाठी त्यांना पालिकेत अनेकदा चकरा माराव्या लागतात. त्यापेक्षा ते ५ हजार रुपये नको, अशी नागरिकांची भूमिका असते. पुणे पालिका १ लाख रुपये देते तर, आपण का देऊ शकत नाही.
वैशाली घोडेकर म्हणाल्या की, पुणे पालिकेने या योजनेला शहरी गरीब योजना असे नाव दिले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण आपल्याकडेही ती योजना राबवू शकतो. महापौर निधीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. २५ लाख रुपये निधीमध्ये आपण प्रत्येक रुग्णाला एक लाख रुपये नाही देऊ शकत.
सागर आंघोळकर म्हणाले, शहरी ग्रामीण योजना शहरामध्ये राबविणे आवश्यक आहे. यासाठी मी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याशी चर्चा करत आहे. महापौर निधी वाढविण्याची सूचना अजित गव्हाणे यांनी केली. पुणे पालिकेच्या योजनेची माहिती घेऊन ती सभागृहासमोर सादर करावी, अशी सूचना पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली. अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, असे राष्ट्रवादीचे राजू मिसाळ म्हणाले.
पिंपरी – चिंचवड पालिकेची शहरात अनेक रुग्णालय आहेत. त्यामुळे नागरिकांना मोफत दरात चांगली आरोग्य सुविधा मिळत आहे. पुणे पालिकेचे स्वत: चे रुग्णालय नसल्याने त्यांना ससूनवर अवलंबून राहावे लागते. पालिकेचे वायसीएम व भोसरी रूग्णालय कोरोनासाठी उपचार देत आहे. तसेच, नवीन जिजामाता, तालेरा, थेरगाव, आकुर्डी, मासुळकर कॉलनी, या ठिकाणी रुग्णालये आहोत. याबाबत नियोजन सुरू आहे. येथील सुविधा व पुणे पालिकेच्या योजनांची सविस्तर माहिती २ महिन्यात सभागृहासमोर सादर केली जाईल.
– श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त…














