- आनंदनगर व रमाबाईनगर मधील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू…
- तर, दिघीमधील विजयनगरचे रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज रविवारी हाती आलेल्या अहवालानुसार ६० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यात ३१ पुरुष व २९ महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील पवनानगर, पुणे व मुंबई येथील दोन पुरुषांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे.
आज शहरातील आनंदनगर मधील ५८ वर्षे वय असणाऱ्या व रमाबाईनगर, पिंपरीतील ६० वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. दरम्यान शहरात सक्रीय रुग्णांची संख्या ७६८ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात २८८ रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरीगांव, जुनी सांगवी, पाटीलनगर चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी येथील रहिवाशी आहेत. विजयनगर, दिघी व धनकवडी, पुणे येथील कोविड बाधित रुग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.











