न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८. जून. २०२०) :- राज्याचे गृहमंत्री देशमुख सोमवारी (दि. ८) रोजी सकाळी पुणे येथून मुंबईला जात होते. बंदोबस्तासाठी त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर पोलिसांकडून पायलटिंग सुरू होते. पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे फाटा ते अमृतांजन पॉईट दरम्यान पौड येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव त्यांच्या सहका-यांसह पायलटिंग करीत होते.
उपनिरीक्षक जाधव यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा द्याव्या यासाठी त्यांच्या मित्रांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा केली. आपण सर्वजण त्यांचा वाढदिवस साजरा करू, असे त्यावेळी देशमुख यांनी सुचविले. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास किवळे फाटा येथे त्यांचा ताफा थांबवला. उपनिरीक्षक जाधव यांच्या मित्रांनी लगेचच केक मागविला. एका चारचाकी वाहनावर केक ठेवण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत उपनिरीक्षक जाधव यांनी केक कापला. देशमुख यांनी जाधव यांना केक भरवला.
कोरोनाच्या संकटकाळात तुम्ही तुमचे कार्य एक योद्धा म्हणून पार पाडत आहात. त्यामुळे पोलिसांचा अभिमान आहे, असे म्हणून देशमुख यांनी जाधव याना शुभेच्छा दिल्या. तर, मित्रांनी मला दिलेले हे सरप्राईज आहे. त्यांनी विनंती केल्यामुळे गृहमंत्री यांनी माझा वाढदिवस साजरा केला. हे सर्व अचानक घडले. याची मला कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया उपनिरीक्षक जाधव यांनी दिली.














