- ‘आमची हातावरची पोटं, आम्हाला मोकळं सोडा’ स्थानिकांच्या प्रतिक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरात आज सोमवारी पुन्हा नागरिकांचा उद्रेक पहावयास मिळाला. आनंदनगर परिसरात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश केला आहे.
आनंदनगरमध्ये आज दुपारी अडीच-तीनच्या दरम्यान येथील जमाव डॉ. आंबेडकर प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन रस्त्यावर उतरला. ‘अजून किती दिवस आम्हाला डांबून ठेवणार, घरातलं होत नव्हत ते सगळ संपल आहे. आमची हातावरची पोटं आहेत. आम्हाला मोकळं सोडा’. अशी मागणी येथील महिला व पुरुष मंडळी पोलिसांकडे करू लागली होती. मात्र, दाद मिळत नसल्याने जमावाच्या मागणीला हिंसक वळण लागले.
काहींनी पोलिसांच्या बुथमधील खुर्त्यांची तोडफोड केली. रस्त्यावर पडलेले दगडं उचलून पोलिसांच्या दिशेने भिरकावली. काही हुल्लडबाजांनी पोलिसांच्या खासगी वाहनांची तोडफोड करीत ती गटारात टाकली. त्यानंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत जमावावर लाठीचार्ज केला. पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळताच राज्य राखीव पोलीस दलासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांची जादा कुमक येताच जमाव पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी गल्लीबोळात शक्तीप्रदर्शन केले. हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. त्यामुळे काही काळ दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान चिंचवड स्टेशनच्या पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. सुरक्षित अंतर न ठेवता बघ्ये पुलावरून खालची स्थिती निहाळत होती. कोणीही जबाबदारीचे भान ठेवताना दिसले नाही. उलट चिंचवडगावाकडे जाणारे नागरिक आपल्या दुचाक्या रस्त्यावरच ‘पार्क’ करून पुलावरून तमाशा पाहू लागली. त्या दरम्यान पोलिसांचा फौजफाटा येताच पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगविली. काहींना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला.
आनंदनगरमध्ये मे महिन्यात अशाच रीतीने येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी आयुक्त हर्डीकर, आमदार बनसोडे, स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी जमावाची समजूत घालून, त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. आता या दुसऱ्या घटनेमुळे येथे कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याचे पडसाद उमटू शकतात.














