न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शाळांनी विद्यार्थ्यांना येत्या १५ तारखेपासून अभ्यासाचे ऑनलाइन धडे देण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी महापालिका शिक्षण विभागाने केली आहे. व्हॉट्सऍप, यूटयूब, शिक्षकांचे ब्लॉग्ज आदी माध्यमातून ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. ” रेडिओ कम्युनिटी ‘ अंतर्गत शिक्षकांकडूनच संचालित एफएम चॅनेलद्वारे ऑडिओच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे.
महापालिका शाळांमध्ये १५ तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी (दि. ११) सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून पिंपरीतील उन्नत केंद्रात दोन सत्रांमध्ये बैठक बोलाविली आहे. त्या वेळी त्यांना विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासाचे प्रात्याक्षिक दाखविले जाणार आहे. त्याची सर्व पूर्वतयारी केली आहे.
शिक्षक – पालकांचे इयत्तानिहाय व्हॉट्सऍप ग्रुप, शिक्षकांचे ब्लॉग्ज बनविले आहेत. रेडिओ कम्युनिटीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. तसेच, आवश्यकता वाटल्यास स्थानिक केबल चॅनेलच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली आहे.