न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५६ लाख २३ हजार इतक्या रकमेच्या खर्चास बुधवरी मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष आण्णा लोंढे होते.
पी.एम.पी.एम.एल. ला संचलन तूट भरून काढण्यासाठी महानगरपालिकेकडून १० कोटी ५० लाख इतकी रक्कम देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना विषयक माहिती नागरिकांना देण्यासाठी येणा-या २ लाख ८३ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास विद्युत मोटर्स दुरूस्ती व रिवायंडिंग करिता येणा-या ३८ लाख २८ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समितीच्या सभेवर गटबाजीचे गडांतर…
स्थायी समितीची बुधवारी दुपारी अडीच वाजता सभा बोलविण्यात आली होती. या सभेपूर्वी पूर्वबैठक पार पडली. या बैठकीला भाजपाचे बहुतांश सदस्य उपस्थित होते. मात्र यानंतर मुख्य सभेला राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाच्या भोसरी गटाचे सर्व सदस्य उपस्थित राहिले. तर दुसऱ्या गटाच्या नगरसेवकांनी सभेला जाण्याचे टाळले. तसेच हजेरी रजिस्टरवरही स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. त्यामुळे भाजपातील एका गटावर दबाव आणण्याबरोबरच स्थायीच्या अध्यक्षांवरही दबाव आणण्याचे तंत्र सुरू झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती रहाव्यात यासाठी सुरू झालेली ही अंतर्गत लढाई कोणत्या टप्प्यावर पोहोचणार याबाबतही तर्क वितर्क लढविले जाऊ लागले आहेत.